‘एक विलेन’नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र

एक विलेन’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख एकत्र दिसले होते. या सिनेमात रितेशने ग्रे शेड भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच या दोघांच्या अभिनयाचे खूप कौतूक केले होते. आता हे दोघे पुन्हा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. दिग्दर्शक मिलाप झवेरी आपल्या आगामी अॅक्शन चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख यांची निवड केली आहे. या सिनेमाची निर्मिती निखिल आडवाणी करणार आहे.
डीएनएच्या रिपोर्टनुसार दिग्दर्शक मिलाप झवेरी अॅक्शन चित्रपट बनवणार आहेत. या सिनेमासाठी त्यांनी सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख यांच्या नावाचा विचार केला आहे. या चित्रपटाची निर्मिती निखिल आडवाणी करणार आहेत. या चित्रपटाबाबतची जास्त माहिती समजू शकलेली नाही. मात्र मिलाप लवकरच या दोघांना चित्रपटाची स्क्रीप्ट ऐकवणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
सध्या सिद्धार्थ मल्होत्रा आगामी चित्रपट ‘जबरिया जोडी’चे चित्रीकरण लखनऊमध्ये करत आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर रितेश देशमुख ‘हाऊसफुल 4’ सिनेमाचे चित्रीकरण करतो आहे. या सिनेमातून रितेशला मोठ्या स्तरावर कमबॅक करायचे आहे. कारण गेल्या बऱ्याच कालावधीपासून रितेशचा कोणताच मोठा सिनेमा प्रदर्शित झाला नाही.
सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख यांना पुन्हा एकत्र रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.